गुरुतत्वयोग : काळाची गरज

आज आपण एकविसाव्या शतकात आहोत, हे विज्ञान युग आहे. मानवाने विज्ञानात प्रचंड प्रगती केली आहे आणि करत आहे. एकाच वेळी तो विश्वातील सूक्ष्मतेचा व व्यापकतेचा वेध घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचप्रमाणे मूलतत्वांचा, त्यांच्या प्रकटीकरणाचा व त्यांच्या उपयुक्ततेचा असा वेध घेत आहे कि जेणेकरून त्याचे भौतिक जीवन सुख समृद्धीकारक होईल. परंतु भौतिक जीवन समृद्धीचे करण्याच्या प्रयत्नात तो नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापरही प्रचंड वेगाने करीत आहे. आपल्या जन्मजात अशा अफाट बुद्धीसामर्थ्याच्या जोरावर मानवाने विज्ञानरूपी राक्षस जागा केला आहे व त्याच्या साहाय्याने केवळ पृथ्वीच नाही तर सर्व विश्व आपल्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. हि वाढ थांबवणे घालणे आता मानवाच्या नियंत्रणापलीकडे गेले आहे. थोडक्यात म्हणजे सुखासाठी केलेली निर्मितीच दुःख व नाशाला कारणीभूत ठरत आहे.

मानव हा विश्वनिर्मात्याच्या सृजनाचा उत्कृष्ट नमुना आहे, म्हणूनच त्याच्यावर त्याचे अतोनात प्रेम आहे. मानवाला त्याने अफाट बुद्धिमत्ता, कल्पना, भावना व संकल्पशक्तीसह तितकीच परिपूर्ण अशी शरीररचना बहाल केली आहे. विश्वनिर्मात्याची अशी अपेक्षा आहे कि या मानवाने आपण निर्माण केलेल्या प्रकट- अप्रकट निसर्ग, पंचमहाभूते, प्राणिमात्र, जीवजंतू व वनस्पती यांच्यावर प्रेम करून, त्यांना समजून घेऊन, परस्परांशी हितसंवाद साधून, परस्परांच्या सुखासाठी व प्रगतीसाठी त्याला दिलेल्या रूपगुणसामर्थ्याचा वापर करावा व या विश्वाला मार्दर्शन करावे. परंतु प्रत्यक्षात असे भीषण चित्र दिसते आहे कि हाच मानव त्याच्या स्वतःबरोबर इतर जीवजंतू, प्राणिमात्र, वनस्पतीसहित सर्व निसर्गाच्या व पर्यायाने विश्वाच्या नाशाला कारणीभूत ठरत आहे.

मानवाच्या सुखाच्या कल्पनाच आता बदलत आहेत. मी व केवळ माझे सुख अशा मर्यादित कल्पनेच्या पूर्ततेसाठी तो प्रसंगी इतरांशी झगडून, ओरबाडून सुख मिळवू पाहतो आहे. परिणामी तो स्वतःचा नाश करण्यासाठी उभा ठाकला आहे. परंतु मानवाला हे कळत नाही कि आपले जगणे हे केवळ आपल्यापुरते मर्यादित नसून भोवतालच्या निसर्ग, प्राणी, वनस्पती, पंचमहाभूते यांच्यासमवेत जगणे असते. आपण एकटे जगूच शकत नाही. तसे करण्याचा प्रयत्न केल्यास आपल्या नाशाबरोबर इतरांचा नाश किंवा इतरांच्या नाशाबरोबर आपला नाश हा अपरिहार्य आहे.

जोपर्यंत आपल्या आजूबाजूला दुःख आहे तो पर्यंत आपण एकटे कधी सुखी होऊ शकणार नाही, आपण दुःखीच राहू. जोपर्यंत आपल्या भोवती अशांती आहे तो पर्यंत आपण शांती मिळवू शकणार नाही. जो पर्यंत आजूबाजूला भुकेलेपण आहे तोपर्यंत फार काळ आपण खाऊन तृप्त होऊ शकत नाही कारण हेच उपाशीपण आपल्याला खायला उठेल. भोवताली अपार दैन्य असताना आपण सुखसमृद्धी ऐश्वर्यात राहिलो तर ते दैन्यच आपल्याला लुटू पहील व प्रसंगी नाशही करेल. जोवर जवळपासचे मानव, प्राणी सुरक्षित नाहीत तोवर आपण एकटेच सुरक्षित राहू शकत नाही. आपल्या आसपास कचरा, घाण व त्यामुळे रोगराई , अनारोग्य असेल तर आपण निरोगी राहू शकत नाही. आपण आपल्या आजूबाजूच्या प्रकट किंवा अप्रकट अस्तित्वाला बाधा आणण्याचा प्रयत्न केल्यास आपलेच अस्तित्व नाहीसे होईल हे निश्चित. सभोवतालच्या प्राणिमात्र किंवा जीवजंतूंचा जगण्याचा अधिकार आपण नाकारू शकत नाही, कारण तसे केल्यास परिणामी आपलाही नाश अटळ आहे.

आता आपल्याला हे समजून घेण्याची वेळ आली आहे की आपले जगणे हे विश्वनिर्मात्याने निर्माण केलेल्या सर्व विश्वासहवर्तमान जगणे असते. आपले जगणे हे विश्वाच्या निर्मितीपासून अंतापर्यंत जगणे आहे. ही जगण्याची प्रक्रिया अखंड, अविरत असून आपण त्याचा एक अविभाज्य घटक आहोत. ज्याप्रमाणे आपल्या शरीरात पेशी निर्माण होतात व नष्ट होतात, नवे रक्त निर्माण होते व जुने नाश पावते, आपण श्वास घेतो व सोडतो याचा अर्थ प्रतिक्षणी आपण जन्मतो व मरतो. जन्म-मरण हा शरीरधर्म आहे. त्याचा आपल्या जगण्याशी काहीही संबंध नाही आणि त्याकारणे आपले जगणे संपत नाही. तसेच आपण विश्वशरीरी असल्याने विश्वाचे जगणे हे आपले जगणे असते. हे सर्व विश्व व त्यातील प्रत्येक अस्तित्व हे आपल्या अस्तित्वाचे अविभाज्य घटक आहेत आणि त्यांच्या जगण्यात आपले जगणे अंतर्भूत आहे.

असे हे जगणे असल्याने विश्वनिर्मात्याला व त्याने निर्माण केलेल्या विश्वाला समजून घेणे आवश्यक आहे. या विश्वातील प्रकट व अप्रकट अस्तित्वाशी , पंचमहाभूते, जीवजंतू, प्राणिमात्र व वनस्पती यांच्याशी प्रेमसंबंध व सुसंवाद साधणे जरुरीचे आहे. याचे ज्ञान होण्यासाठी गुरुतत्वयोग समजणे, उमजणे आणि साधणे आवश्यक आहे.

2018-01-31T05:15:58+00:00

Leave A Comment