गुरुतत्वयोग ही एक जगण्याची कला आहे. आपल्या सभोवतालच्या समाज, प्राणिमात्रांना आनंद देत स्वतः आनंद कसा मिळवावा हे शिकवणारं शास्त्र आहे. ह्याला योग , अध्यात्म, जीवनप्रणाली काहीही नाव दिले तरी सुख, समाधान, शांती हेच त्याचे साध्य आहे, किंबहुना काही साधणे हे सुद्धा अपेक्षित नाही तर सहजतेने जगणे म्हणजेच गुरुतत्त्वयोग !
गुरुतत्व हे एक मार्गदर्शक मूलतत्व आहे. ते आपल्यासह सर्व सृष्टीला सतत मार्गदर्शन करीत असते. प्राणी, पक्षी, निसर्ग, माणूस हीच त्याच्या मार्गदर्शनाची माध्यमे आहेत. हे गुरुतत्व जन्मतःच आपल्यामधे आहे, आणि त्याचे मार्गदर्शन कसे स्वीकारायचे हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. परंतु बाह्य गोंधळांमुळे आपल्याला त्याचा विसर पडला आहे. यासर्व गोंधळातून शांत होऊन गुरुतत्वाचे मार्गदर्शन स्वीकारण्यासाठी लागणारी तरलता, सहजता येणे म्हणजे गुरुतत्वयोग. गुरुतत्वयोग साधल्याने आपण पुन्हा एकदा गुरुतत्वाशी एकरूप होऊन आनंदमय जीवन जगू शकतो.
गुरुतत्वयोग काय आहे हे समजण्याआधी कोणालाही हा प्रश्न पडणे साहजिकच आहे कि त्याचा उपयोग काय? लौकिक जीवनामध्ये प्रगती करत असताना कशासाठी हवे आहे हे अध्यात्म? आणि गुरुतत्त्वयोग ?
आपलं जीवन मग ते लौकिक असो वा अध्यात्मिक, ते यशस्वी होण्यासाठी अध्यात्माचा उपयोग होतो. जीवनाचे आकलन करून देणारा हा मार्ग आहे त्यामुळे संसार, व्यवहार सोडून करायची ही प्रक्रिया नाही. त्याचप्रमाणे आयुष्याच्या शेवटी, निवृत्ती नंतर करण्याची सुद्धा नाही. तर ज्या वयात सर्वात जास्त ताणतणाव, समस्या, अडचणी येतात त्याच वेळी योगाची आपल्याला सर्वात जास्त गरज असते. जगण्यात येणाऱ्या अडचणी, गोंधळ, यशापयश, दुःख इ. गोष्टींवर मात करण्यासाठी यांचे संपूर्ण आकलन होणे आवश्यक आहे. हे आकलन होण्यासाठी आपल्याला अशा मानसिकस्थिती ची गरज आहे जी गोंधळलेली नाही , थकलेली नाही. अशी अवस्था प्राप्त करून देणारा मार्ग म्हणजे गुरुतत्वयोग
गुरुतत्व हे या विश्वरूपी नाट्याचा लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक आहे. या नाटकामध्ये आपल्या सर्वांना एक भूमिका दिली आहे. त्या भूमिकेनुरूप आपण हे नाटक पुढे नेत आहोत आणि एकमेकांच्या भूमिका फुलवत आहोत. परंतु हि भूमिका करताना कोठे ना कोठे थोडीशी चूक होण्याची शक्यता आहे हे गुरुतत्वाला माहीत आहे. रंगभूमीवरचा कलावंत आपली भूमिका परिश्रमपूर्वक करत असताना त्याच्या हातून घडू शकणाऱ्या छोट्याश्या चुकीमुळे नाट्यभंग होऊ नये यासाठी , त्याच्या मदतीसाठी विंगेमधे प्रॉम्प्टरची नियुक्ती दिग्दर्शकाने केलेली असते. एखादा शब्द विसरला तर प्रॉम्प्टरच्या मदतीने तो नट बेमालूमपणे ती चूक सुधारतो. हे इतक्या झटपट आणि सहजतेने घडते की प्रेक्षकांना ते कळतही नाही. अगदी हीच मदत आपल्याबाबतीत गुरुतत्व करीत असते. ‘येथे तुझे चुकते आहे’ किंवा ‘तू या प्रमाणे कार्य कर ‘ असे ते तुमच्या आतूनच तुम्हाला सांगते. ज्या क्षणी चूक होईल, त्याच क्षणी मार्गदर्शन होऊन चूक दुरुस्त होईल अशी व्यवस्था त्याने आतमध्येच करून ठेवली आहे.
जेंव्हा आतले मार्गदर्शन योग्य रीतीने घडणार नाही त्यावेळी बाहेरूनही मार्गदर्शन मिळेल अशी व्यवस्था त्याने केली आहे. जर नटाला प्रॉम्प्टरच्या सूचना ऐकू आल्या नाहीत तर सहकलाकार त्याला सावरून घेतो पण नाटकाचा रसभंग होऊ देत नाही. त्याचप्रमाणे या विश्वप्रकटीकरणातील विविध माध्यमे, प्राणिमात्र, पशुपक्षी हे नाट्य चुकते आहे हे समजून आपल्याला सूचना देतात आणि चुका सुधारतात. त्यामुळे आपली भूमिका पार पाडताना आपली एक जाणीव आपल्या आतल्या व बाहेरील प्रॉम्प्टरकडे ठेवण्याची गरज आहे.
एखादा नट जेंव्हा फक्त स्वतःपुरता विचार करतो तेंव्हा सर्व नाटकाचा तोल ढळतो, पण प्रत्येक नट जेंव्हा स्वतःच्या भूमिकेसहित सहकलाकारांच्या भूमिका खुलवत नेण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा teamwork मुळे नाटक रंगते. आपल्या जीवनाचे सुद्धा असेच आहे, मी फक्त माझ्यापुरता विचार करून जगू लागले की समतोल बिघडतो. हाच समतोल बिघडू नये यासाठी गुरुतत्व सतत कार्यरत असते. विश्वातील सर्वांच्या आनंदातून एकत्रित आयुष्य फुलावे ही गुरुतत्वाची अपेक्षा आहे. यासाठी पंचमहाभूते , प्राणिमात्र, वृक्षवेली तसेच आपल्याही स्तरावर गुरुतत्त्व हे एक मार्गदर्शक तत्व म्हणून वावरत असते.
त्याचे मार्गदर्शन एकदा स्वीकारून भागत नाही तर हा continuous process आहे. ते गतिशील आहे त्यामुळे त्याच्या गतीशी आपल्याला जुळवून घेत राहावे लागते. जेंव्हा आपण एकाच स्थितीत अडकू त्यावेळी ते मार्गदर्शन आपल्याला मिळणार नाही. रंगमंचावर नट आपला संवाद म्हणताना दहा मिनिटांपूर्वी झालेल्या प्रसंगात गुंतून राहिला तर सगळे नाटक कोसळेल. तीच स्थिती आपण भूतकाळात घडून गेलेल्या घटनेत अडकलो तर होते. ह्या जीवनाचे प्रत्येक क्षणी नवनवीन प्रकटीकरण होत असते आणि त्याचा आनंद घेण्यासाठी तसेच गुरुतत्वाचे मार्गदर्शन मिळविण्यासाठी आपली जाणीव वर्तमानातील चालू क्षणात असणे आवश्यक आहे.
‘गुरुतत्वयोग’ हा क्षणोक्षणी जगण्याचा योग आहे व आपण त्याप्रमाणे जगलो तर तेथे दुःखाला वावच असणार नाही. हा योग , विशिष्ट वेळेमध्ये, वयात, स्थानामध्ये साधण्याचा नाही तर प्रतिक्षणी अनुभवायचा आहे. जर चालू क्षणाचे यथायोग्य आकलन झाले तर येणार प्रत्येक क्षण, व्यक्ती नवीनच वाटते त्यामध्ये कोणतीही पूर्वग्रहदूषित दृष्टी नसते. निसर्गातला प्रत्येक आवाज, सुगंध, उगवणारा सूर्य या सर्व गोष्टी आपण प्रथमच अनुभवत आहोत अशा वाटतात, कारण त्यात आठवणी नसतात ते फक्त जगणे असते. बालपण, तारुण्य, प्रौढावस्था, इतकेच नाही तर वृद्धावस्था देखील अशा रीतीने चैतन्यमय होऊ शकते. गुरुतत्वाशी सुसंवाद साधून आपण जगू शकलो तर मृत्यूदेखील तितकाच आनंदमय होऊ शकतो. हा प्रतिक्षणी घडणारा खेळ समजून घेणे, उमजणे व त्याप्रमाणे जगणे हाच गुरुतत्वयोग आहे.
हा गुरुतत्वयोग साधला तर आपल्या आयुष्यात कोणत्याही चुकीच्या गोष्टी घडणार नाहीत ; निर्णय चुकणार नाहीत व त्यायोगे निर्माण होणारे दुःखही भोगावे लागणार नाही. आपण इतरांबरोबर आनंदाची देवाण घेवाण करू शकू. हे सर्व नाट्य आनंदकारक होईल आणि ज्यावेळी आपली भूमिका संपेल त्यावेळी तितक्याच आनंदाने आपण विंगेत परत जाऊ.
Leave A Comment